Thursday 9 June 2011

१००० वेळा वाचला गेलेला !

मी का फारशी शिकलो?
मागल्या फ़ेब्रुवारीत माझा दुचाकीवर अपघात झाला, डावा कोपर मोडला. आता मिळालेल्या सक्तीच्या विश्रांतीत काय करावे? म्हणून मी हा ब्लॉग लिहायला सुरुवात केली. त्यातून वेदना विसरून गेलो.
फार वर्षांपूर्वी आमच्या कॅंपातल्या शाळेत एक पैसा सापडला. हा कंपनी सरकारचा होता. त्यावर एका बाजूला एक तराजू आणि काही अगम्य अक्षरे होती. अरबी वळणाची अक्षरे पाहून अर्थ लावण्यासाठी माझी धडपड सुरू झाली. आमच्या शेख सरांनी "अ द ल " वाचून दाखवले. त्याचा अर्थ न्याय असा सांगीतला. मग सापडेल तसा फारसी शब्दांच्या मागे लागलो, शोधून साठवू लागलो.
ज्या गावी जाईन तिथे फार्सी पुस्तके शोधू लागलो. अलीगढ, हैदराबाद, दिल्ली, पुणे, मुंबई- येथे जाणाऱ्या मित्रांना सांगू लागलो. अगदी पाचगणीच्या न्यू इरा या शाळेशी संबंधित श्री  मसूद यानी तर इंटर्नेट्वरून सीडी मागवून आणून दिली. उमराणी काकांनी फ़ारसी - उर्दू शब्दकोष  हैदराबादहून आणून दिला. असे जवळपास गेली २५ वर्षे चालू होते.
मात्र मराठीत या भाषेची साधने दुर्मीळ दिसली.
मराठी माणूस इतिहासात रमणारा, त्यामुळे नव्या इतिहास लेखकांची चलती आहे. त्यांनाही काही शब्दांवरून - सुतावरून स्वर्ग गाठायची घाई.
बाला किला, बाला घाट, पाईने विलायत यातील बाला आणि पाईन या शब्दांना अडखळून एक होतकरु इतिहासकार पडल्याचे माझ्या लक्षात आले.
या ब्लॉगवर सर्वकाही आहे असा माझा दावा नाही! पण संशोधकांच्या मार्गावरील काटे जरा बाजूला झाले तरी खूप झाले.