Monday 18 July 2011

येऱ्या गबाळ्याचे काम नोहे!

आतापर्यंत अक्षर आणि लिप्यांची आपण ओळख करून घेतली, आज केवळ मौज म्हणून काही सुलेखने वाचूया.
अमीन अल मुल्क अशरफ अल दौला अलीक्झान्दर हान्नी बहादूर अर्सलन जंग  ११८५ (हिजरी )
नस्तलिक़ लिपीतील हा मुद्रालेख, पाचूवर कोरला आहे. सोन्याच्या, हिऱ्यांनी सजवलेल्या अंगठीवर वेलबुट्टी आहे. विलियम हेस्टीगच्या फौजेतील मेजर अलेक्झांडर हान्नी भारतात अठराव्या शतकात आला. अर्थातच अत्यंत महत्वाकांक्षी, लोभी आणि साहसी असा हा लष्करी अधिकारी, मूळचा स्कॉट शेतकऱ्याचा मुलगा. युरोपातील सप्तवार्षिक युद्धात शौर्य गाजवून ४ ऑगस्ट १७६४ ला तो बंगाल मध्ये इस्ट इंडीया कंपनीच्या बंगाल आर्मीत सामील झाला.
रोहीलखंडातील अफगाणांनी  मराठ्यांविरोधात शुजा उद दौलाची मदत घेतली, पण त्या बदल्यातील रक्कम अदा करायला नकार दिला.
शुजा उद दौलाने इंग्रजांची मदत मागीतली, २३ एप्रील १७७४ ला मिरंपूर कत्रा च्या लढाईत इंग्रजांनी ४०,००० रोहिल्यांची फौज गारद केली. या लढाईत झालेल्या अत्याचार, लुटीवर बंगाल कौन्सीलने चौकशी कमिटी बसवली. वॉरन हेस्टीगच्या बाजूने साक्ष देणारा, गव्हर्नर जनरल च्या गळ्यातला ताईत बनला. पुढची सर्व कहाणी अवधच्या अनन्वीत लुटीची आहे. इंग्रजांच्याच शब्दात "त्याच्या छळाला कंटाळून झालेल्या बंडात १७८१ साली अवधच्या बेगमेच्या प्रेरणेने बनारसच्या राजा चैतसिंगाने ४००० ईग्रज शिपाई मारले, हान्नीला वाचवायला हेस्टीगला फौज पाठवावी लागली, हान्नी एखाद्या रक्त पिऊन फुगलेल्या जळूसारखा प्रचंड संपत्ती घेऊन कलकत्त्यात परतला पण....
वर्षभरातच एक्केचाळीसाव्या वर्षी मरून गेला."
त्याच्या अफाट संपत्तीतील ही अंगठी,
"अमीन अल मुल्क अशरफ अल दौला अलीक्झान्दर हान्नी बहादूर अर्सलन जंग  ११८५ (हिजरी )" हा मजकूर कोरलेली. 
वाचताना पर्शीयन नियमाप्रमाणे उजव्या खालच्या कोपऱ्यापासून सुरुवात करावी, नंतर वरच्या ओळीतील उजव्या बाजूने वाचावे.