Monday 18 July 2011

येऱ्या गबाळ्याचे काम नोहे!

आतापर्यंत अक्षर आणि लिप्यांची आपण ओळख करून घेतली, आज केवळ मौज म्हणून काही सुलेखने वाचूया.
अमीन अल मुल्क अशरफ अल दौला अलीक्झान्दर हान्नी बहादूर अर्सलन जंग  ११८५ (हिजरी )
नस्तलिक़ लिपीतील हा मुद्रालेख, पाचूवर कोरला आहे. सोन्याच्या, हिऱ्यांनी सजवलेल्या अंगठीवर वेलबुट्टी आहे. विलियम हेस्टीगच्या फौजेतील मेजर अलेक्झांडर हान्नी भारतात अठराव्या शतकात आला. अर्थातच अत्यंत महत्वाकांक्षी, लोभी आणि साहसी असा हा लष्करी अधिकारी, मूळचा स्कॉट शेतकऱ्याचा मुलगा. युरोपातील सप्तवार्षिक युद्धात शौर्य गाजवून ४ ऑगस्ट १७६४ ला तो बंगाल मध्ये इस्ट इंडीया कंपनीच्या बंगाल आर्मीत सामील झाला.
रोहीलखंडातील अफगाणांनी  मराठ्यांविरोधात शुजा उद दौलाची मदत घेतली, पण त्या बदल्यातील रक्कम अदा करायला नकार दिला.
शुजा उद दौलाने इंग्रजांची मदत मागीतली, २३ एप्रील १७७४ ला मिरंपूर कत्रा च्या लढाईत इंग्रजांनी ४०,००० रोहिल्यांची फौज गारद केली. या लढाईत झालेल्या अत्याचार, लुटीवर बंगाल कौन्सीलने चौकशी कमिटी बसवली. वॉरन हेस्टीगच्या बाजूने साक्ष देणारा, गव्हर्नर जनरल च्या गळ्यातला ताईत बनला. पुढची सर्व कहाणी अवधच्या अनन्वीत लुटीची आहे. इंग्रजांच्याच शब्दात "त्याच्या छळाला कंटाळून झालेल्या बंडात १७८१ साली अवधच्या बेगमेच्या प्रेरणेने बनारसच्या राजा चैतसिंगाने ४००० ईग्रज शिपाई मारले, हान्नीला वाचवायला हेस्टीगला फौज पाठवावी लागली, हान्नी एखाद्या रक्त पिऊन फुगलेल्या जळूसारखा प्रचंड संपत्ती घेऊन कलकत्त्यात परतला पण....
वर्षभरातच एक्केचाळीसाव्या वर्षी मरून गेला."
त्याच्या अफाट संपत्तीतील ही अंगठी,
"अमीन अल मुल्क अशरफ अल दौला अलीक्झान्दर हान्नी बहादूर अर्सलन जंग  ११८५ (हिजरी )" हा मजकूर कोरलेली. 
वाचताना पर्शीयन नियमाप्रमाणे उजव्या खालच्या कोपऱ्यापासून सुरुवात करावी, नंतर वरच्या ओळीतील उजव्या बाजूने वाचावे.



Saturday 16 July 2011

फारसी कॅलीग्राफी - फार्सी सुलेखन २- अरबी

अक्षराची भूमिती
अरबी लिपीत अक्षरांच्या भौमितिक आकारांचे प्रमाण सौंदर्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. सरळ उभ्या दंडाने दर्शवलेल्या ‘अलिफ’ या पहिल्या अक्षराच्या मापाने पुढील सर्व अक्षरांचे आकार ठरतात. ‘अलिफ’ हा लेखकाच्या शैली नुसार तीन ते बारा टिंबांच्या मापाचा असतो. टिंब लेखणीच्या टोका इतका असावा. तितकीच जाडी ‘अलिफ’ ची असावी. ‘अलिफ’च्या व्यासाचे वर्तुळ सर्व अक्षरांना सामावून घेते. 

  • अरबी सुलेखन - शैली

सुलेखन कलेत या लिपी इतके प्रयोग आणि वैविध्य इतरत्र क्वचितच सापडते. शंभरावर शैली प्रसिद्ध असल्या तरी त्यांचे- कुफि(कुफिक़) ही भौमितिकदृष्ट्या प्रमाणबद्ध आणि नस्ख, रुक़ा, तुलुथ आणि इतर लपेटीदार अक्षरशैली असे प्रमुख दोन प्रकार पडतात.

  • कुफी 
शिलालेख वगैरे कोरण्यास आयताकृती, भौमितिक आकार यामुळे वापरली जाणारी.{वाचन :- बिस्मिल्लाह अल रहमान अल रहीम}












  • तुलुथ
तुलुथ म्हणजे १/३ तृतीयांश, लेखणीच्या आकारामुळे हे नाव पडले आहे. ही लिपी तुमार या लिपीवरून तयार झाली. {वाचन :- बिस्मिल्लाह अल रहमान अल रहीम}











  • नस्ख نسخه
copy म्हणजे नक्कल या अर्थाच्या शब्दाने ओळखली जाणारी नस्ख लिपी प्रमाणबद्ध आणि सुवाच्य आहे. त्यामुळेच धर्मग्रंथ, पुस्तके याच लिपीत लिहीत. 
{वाचन :- बिस्मिल्लाह अल रहमान अल रहीम}





    • ता लिक़ 

    तालिक़ म्हणजे टांगलेली, फारसी ने ९व्या शतकात संशोधित केलेली लिपी, यात शब्दातील अक्षरे एकमेकांना जोडली जाताना बेसलाईन पासून वर चढत जातात. {वाचन :- बिस्मिल्लाह अल रहमान अल रहीम}




    • दिवानी

    ता’लिक़ वरून ओटोमान तुर्कांनी आपल्या दरबारी पत्रांसाठी तयार केलेली दिवानी लिपी, आपल्या गिचमीडपणात अव्वल आहे.

















    • रिक़ा
    लिहायला सोपी आणि वेगवान लिपी रोजच्या लिखाणाला उपयुक्त.


    केवळ अक्षरातून चित्र निर्माण करण्याची शैली फारसीत रूढ झाली.




    • प्रतिबिम्ब










    • तोघ्रा













    अक्षरचित्र.

    Thursday 14 July 2011

    फारसी कॅलीग्राफी - फार्सी सुलेखन

    या आधी म्हणजे ‘फार्सी लिपीचे प्रकार’ या धड्यात [link: http://farsi-marathi.blogspot.com/2011/02/blog-post_8188.htmlआपण फारसी लिपीचे प्रकार पाहिले आहेत. 
    नेस्ख आणि तालिक़ या लिप्यांच्या संगमातून बनली ‘नेस्तालिक़’ लिपी. सुलेखन (खरं तर अक्षरचित्रे ) काढण्यासाठी हिचा फार उपयोग केला जातो. हिला अक्षरचित्रांची वधू(प्रियतमा) म्हणून लाडाने ओळखले जाते. कालौघात हिच्यात फार थोडे बदल झाल आहेत. ‘मीर अली तब्रीझी’ यांनी सातशे वर्षांपूर्वी तयार केलेले वळण इतकं संपूर्ण आहे की त्यात बदल असंभव!


    सोबतच्या चित्रात कलम तासण्याची रीत दाखवलेली आहे. 
     ‘कलम’च्या टोकाच्या प्रमाणात अक्षरे त्यांची उंची दाखवलेली आहे.